तळागाळातील व्यक्तींचा सर्वांगीण विकास हेच भाजपाचे ध्येय : सभापती प्रा. राम शिंदे
प्रशिक्षण शिबिरास सभापती प्रा. राम शिंदेंचा कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथे आयोजित दोन दिवसीय पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान शिबिरात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तळागाळातील व्यक्तींचा सर्वांगीण विकास हेच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख ध्येय असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारधारेवर चालणारा भाजप देशभरात सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाची विचारधारा व कार्यसंस्कृती ही कार्यकर्ता केंद्रीत असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परीने पक्षासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.

जामखेड शहर व ग्रामीण मंडलाच्या वतीने विठाई मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन व समारोप प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. दोनही दिवस त्यांनी शिबिरात सहभाग घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी योग, शारीरिक आरोग्य, वैयक्तिक शिस्त आणि संघटनात्मक कार्यातील सातत्य यावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.

“राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः” हा विचार भाजप कार्यकर्त्यांमध्ये दृढ असल्याचे सांगत, केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. इतर पक्षांच्या तुलनेत भाजपाची कार्यपद्धती वेगळी असून संघटनात्मक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध विषयांवर मार्गदर्शन
या प्रशिक्षण शिबिरात विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जामखेड शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद यांनी केले.

प्रथम सत्र : वैचारिक अधिष्ठान – नवनाथ बन (प्रदेश मुख्य प्रवक्ते)
द्वितीय सत्र : बूथ व्यवस्थापन – रवि अनासपुरे
तृतीय सत्र : पक्ष कार्यपद्धती व संघटन विस्तार – राम सातपुते (प्रदेश चिटणीस, माजी आमदार)
चतुर्थ सत्र : सोशल मीडिया, एआय व नमो अॅप – राजेश्वर श्रीराम
पाचवे सत्र : सरकारची कामगिरी – प्रदीप पेशकार
सहावे सत्र : इतिहास व विकास – प्रा. भानुदास बेरड
सातवे सत्र : कार्यकर्ता कार्यपद्धती – राम कुलकर्णी
या सत्रांच्या अध्यक्षस्थानी अजय काशीद, प्रांजलताई चिंतामणी, प्रा. मधुकर राळेभात, शरद कार्ले, रवींद्र सुरवसे, डॉ. भगवान मुरूमकर आणि दत्तात्रय वारे आदी मान्यवर होते.

अहिल्यानगर भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या शिबिरातून कार्यकर्त्यांना पक्ष विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती, तांत्रिक साधनांचा वापर तसेच बूथ स्तरावरील नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जामखेड नगराध्यक्ष सौ. प्राजंलीताई चिंतामणी, शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद, ग्रामीण मंडलाध्यक्ष बापूसाहेब ढवळे, महिला मंडलाध्यक्ष संजीवनीताई पाटील, मनोजकाका कुलकर्णी, अमित चिंतामणी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


