शिऊरमध्ये मध्यरात्री घरफोडी; दीड लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शिऊर येथे मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ५६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अंकुश रामभाऊ निकम (वय ७५, रा. शिऊर) हे आपल्या मुलासह शुक्रवारी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. घराला बाहेरून कडी लावलेली असताना घरामध्ये त्यांची पत्नी व सून झोपलेल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री १ ते २ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराची कडी उघडून आत प्रवेश केला. त्यांनी कपाटातील सुमारे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

पहाटे शेतातील मोटार बंद करण्यासाठी घरी संपर्क साधला असता घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निकम यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विद्या बांगर या करीत आहेत.

चोरीच्या वाढत्या घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
जामखेड तालुक्यात अलीकडील काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यात २५ मार्च रोजी वाघा येथे ३ लाख ९६ हजारांची घरफोडी झाली होती. तसेच १२ एप्रिल रोजी बावी येथे ७२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. १९ एप्रिल रोजी आघी येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्नही झाला होता.

या पार्श्वभूमीवर शिऊरमधील ताज्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



