भरदिवसा वृद्ध महिलेची ४० हजारांची पिशवी लंपास; महिला चोरट्यांची टोळी सक्रिय?

- Advertisement -spot_img

भरदिवसा वृद्ध महिलेची ४० हजारांची पिशवी लंपास; महिला चोरट्यांची टोळी सक्रिय?

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरात भरदिवसा पाळत ठेवून एका वृद्ध महिलेची ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “सावध राहा” असा इशाराच या घटनेतून मिळत आहे.

ही घटना शहरातील सहकार बँक शेजारील खरेदी-विक्री कॉम्प्लेक्समधील नेत्रदीप चष्माघर येथे घडली. विमल भगवान तवटे (रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) यांनी भारतीय स्टेट बँक शाखेतून पेन्शनचे ४० हजार रुपये काढल्यानंतर चष्मा दुरुस्तीसाठी दुकानात प्रवेश केला होता.

दरम्यान, दोन संशयित महिलांनी आधीच त्यांचा पाठलाग केल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले आहे. दुकानात तवटे आजी पैसे देत असताना त्यांनी पिशवी काउंटरवर ठेवली. याच संधीचा फायदा घेत त्या दोघींनी “आँखों का चष्मा है क्या?” असा बहाणा करत लक्ष विचलित केले आणि काउंटरवरील पिशवी चोरून लगेच पळ काढला.

घटना लक्षात येताच दुकानदाराने त्यांचा पाठलाग केला, मात्र आरोपी महिला बाहेर उभी असलेल्या पांढऱ्या चारचाकी गाडीत बसून पसार झाल्या.या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणी आणि सीसीटीव्ही असतानाही अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.जामखेड शहर व तालुक्यात चोरी, लूटमार, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता या घटनेतून समोर आली आहे.पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी विशेषतः बँकेतून पैसे काढल्यानंतर सावध राहावे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीबरोबरच दिवसा देखील गस्त वाढवावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा