गुणवत्ता, शिस्त आणि आधुनिक शिक्षणाचा संगम; श्री नागेश विद्यालयाचा दहावी निकालात झंझावात..
124 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 93.77 टक्के निकालाने जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा मानाचा तुरा..
जामखेड प्रतिनिधी
जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा ठसा उमटवत श्री नागेश विद्यालयाने यंदाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आधुनिक शिक्षणपद्धती, शिस्तबद्ध वातावरण आणि अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर विद्यालयाने 93.77 टक्के निकालाची दमदार नोंद करत यशाची परंपरा कायम राखली आहे.

विशेष म्हणजे 124 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत विद्यालयाच्या गुणवत्तेची चमक अधिक उजळवली आहे.
यंदा विद्यालयातून 225 विद्यार्थी एसएससी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 51 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. तसेच 29 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 07 विद्यार्थ्यांनी पास श्रेणीत यश मिळविले. निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सार्थक विजयकुमार चौधरी याने 94.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धांत बळभीम फरताडे याने 93.60 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर रामकृष्णा सोनबा कोल्हे आणि पवार ऋषिकेश चंद्रकांत यांनी प्रत्येकी 93.40 टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला. शिंदे सार्थक सचिन या विद्यार्थ्याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष कौतुक मिळविले.

विद्यालयात राबविण्यात येणारे एआय आधारित शिक्षण, एनएमएसएस व स्कॉलरशिप मार्गदर्शन, नवोदय व गुरुकुल विभाग, विविध स्पर्धा परीक्षा, एनसीसी (आर्मी) युनिट, आधुनिक संगणक लॅब, सीसीटीव्ही यंत्रणा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यामुळे गुणवत्तेचा मजबूत पाया तयार झाला असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड देत विद्यालयाने प्रगतीचा वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

या यशाबद्दल आमदार रोहित पवार, राजेंद्र कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, प्राचार्य मडके बी. के.,पर्यवेक्षक जाधवर एस. व्ही., शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाची उज्ज्वल यशपरंपरा आगामी काळातही अशीच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


