संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा भक्तिभावात संपन्न..
पालखी मिरवणूक, एकनाथी भारूड व महाप्रसादाने भुतवडा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील भुतवडा येथे आषाढी एकादशीनंतरच्या दुसऱ्या दिवशी रविवारी संत श्री तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भुतवडा गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी संतांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला..

यावेळी संत तुळसापुरी महाराजांची प्रतिमा आकर्षक पालखीत विराजमान करून वाद्यवृंदाच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावनाचे कलश धारण करून तर युवकांनी डफाच्या तालावर लेझीम खेळत मिरवणुकीत रंग भरला. ‘जय तुळसापुरी महाराज’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

पालखी संतांच्या वास्तव्यास असलेल्या मार्गाने जिवंत समाधी मंदिरात दाखल झाल्यानंतर समाधीची विधीवत पूजा, आरती आणि दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
संतांचा वारसा जपणे ही काळाची गरज : मान्यवर
कार्यक्रमात दर्यापूर येथे कार्यरत असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा भुतवडा गावचे सुपुत्र सत्यवान डोके यांनी संत तुळसापुरी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, नाथपंथीय परंपरेतील या संतांनी समाजाला अध्यात्म, मानवता आणि सेवाभावाचा संदेश दिला. संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्ष अमित चिंतामणी यांनी संत परंपरेमुळे समाजात ऐक्य, बंधुभाव आणि संस्कार टिकून राहतात, असे सांगितले. उद्योजक शिवाजी डोके यांनी संतांचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून त्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
अॅड. हर्षल डोके यांनी युवकांनी संतांच्या विचारांचा स्वीकार करून समाजकार्यात सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले. नगरसेवक श्रीराम डोके यांनी धार्मिक व सामाजिक परंपरा जपण्यासाठी अशा सोहळ्यांचे महत्त्व अधोरेखित केले, तर प्रा. अनिल डोके यांनी संत साहित्य व मानवतेचा संदेश जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
एकनाथी भारूडाने रंगली भक्तिरंगाची मैफल
सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिरासमोर भारूडरत्न कृष्णा जोगडंद यांच्या एकनाथी भारूडाचा प्रभावी कार्यक्रम झाला. भारूडाच्या माध्यमातून अध्यात्म, समाजप्रबोधन आणि संस्कारांचा संदेश देण्यात आला. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी या कार्यक्रमाचा उत्स्फूर्त आनंद घेतला.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यवान डोके, गटविकास अधिकारी महेश डोके, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, उद्योजक शिवाजी डोके, नगरसेवक श्रीराम डोके, प्रविण होळकर, अॅड. हर्षल डोके, जयसिंग डोके, प्रा. अनिल डोके, सचिन डोके, गणेश डोके, राहुल डोके, बजरंग डोके, संजय डोके, अशोक डोके, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, नासीर पठाण, सुदाम वराट, मयूर भोसले यांच्यासह ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडविणारा संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा यंदाही धार्मिक वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.



