सहारा बालगृहाचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन.
जनविकास सेवाभावी संस्थेचा सामाजिक उपक्रम; जनसंपर्क कार्यालयाचेही होणार लोकार्पण.
जामखेड | प्रतिनिधी
जामखेड येथील जनविकास सेवाभावी संस्था प्रणित ‘सहारा बालगृह’ या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन मंगळवार, दि. २८ जुलै रोजी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बालगृहामुळे निराधार व उपेक्षित बालकांना सुरक्षित निवारा, संगोपन आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

जामखेड शहरालगतच्या जमादारवाडी-सरोळा रोड परिसरात प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या सहारा बालगृह सुरू केले असून येथे काही विद्यार्थ्यांनी वास्तव्यालाही सुरुवात केली आहे. समाजातील वंचित आणि गरजू बालकांना आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, या कार्यात राम पवार आणि नगरसेवक हर्षद काळे यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.

याच कार्यक्रमादरम्यान प्रभाग क्रमांक ५ मधील कुंभातळे येथे नगरसेवक हर्षद काळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचेही लोकार्पण प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांशी नियमित संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
“समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू घटकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत काम करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सहारा बालगृहाच्या माध्यमातून अनेक बालकांच्या जीवनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई पवार यांनी सांगितले.
तर, “जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांशी थेट संपर्क राहावा, त्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लागाव्यात या उद्देशाने जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. सामाजिक कार्य आणि लोकसेवा हेच आमचे ध्येय असून त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील,” असे नगरसेवक हर्षद काळे यांनी सांगितले.

या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नागरिक, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



