साकत घाट पुन्हा ठरला धोकादायक; भाविकांची मिनीबस दरीत कोसळली, चौघांची प्रकृती गंभीर.

- Advertisement -spot_img

साकत घाट पुन्हा ठरला धोकादायक; भाविकांची मिनीबस दरीत कोसळली, चौघांची प्रकृती गंभीर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील साकत घाटात मध्यप्रदेशातील भाविकांना घेऊन जाणारी मिनी ट्रॅव्हल्स पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून सुमारे वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मध्यरात्रीनंतर ही घटना घडल्याने घाट परिसरात एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून सुमारे २२ भाविकांना घेऊन मिनी ट्रॅव्हल्स (डी डी ०१ एएल ९७७७) मुक्ताईनगर, शेगाव, औढा नागनाथ व तुळजापूर मार्गे जेजुरीकडे निघाली होती. रात्री दोनच्या सुमारास साकत घाटात एका वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचा वळणावरील ताबा सुटला. त्यानंतर मिनीबसने संरक्षक कठडा व दिशादर्शक फलकाला धडक दिली आणि वाहन थेट रस्त्याच्या खाली खड्यात जाऊन पलटी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाला. अंधारात अनेक प्रवासी जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते. काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात वंदना कैलास महाजन, योगिता ज्ञानेश्वर महाजन, अनिल काशिनाथ महाजन आणि चालक गौरव महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. त्यापैकी दोन महिलांना हात-पायांच्या शस्त्रक्रियेसाठी पुण्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, पंचदेवालय ते सौताडा रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात साकत घाटातून वळविण्यात आली आहे. मात्र घाट अरुंद असून तीव्र वळणांमुळे अवजड व मोठ्या वाहनांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

साकत घाटात वारंवार अपघात होत असल्याने घाटातील धोकादायक वळणे कमी करून रस्ता तातडीने रुंद करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा