२० सप्टेंबरपर्यंत कर्जत एसटी डेपो सुरु करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

- Advertisement -spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि मित्रपक्षांच्या लाक्षणिक उपोषणानंतर प्रशासनाला जाग

१० सप्टेंबरपर्यंत १० एसटी बसही सुरु करणार

जामखेड प्रतिनिधी
बांधून तयार असलेले आणि उद्घाटनही झालेले कर्जत बस आगार तत्काळ सुरु करण्याच्या मागणीसाठी कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्र पक्षांच्यावतीने कर्जत बसस्थानक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. या उपोषणाची दखल घेत २० सप्टेंबरपर्यंत कर्जत डेपो सुरु करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे तसेच १० सप्टेंबरपर्यंत १० एसटी बस सुरु करण्याचे आश्वासन एसटी महामंडळाकडून देण्यात आले. तसे पत्र अहिल्यानगर विभागीय नियंत्रकांकडून आंदोलकांना देण्यात आले.

कर्जतच्या बस डेपोचा प्रश्न गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून कर्जतच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभेच्या अनेक निवडणुका या बस डेपोच्या प्रश्नावर लढवल्या गेल्या, परंतु एकाही लोकप्रतिनिधीला हा प्रश्न मार्गी लावता आला नाही.

अखेर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत कर्जतला एसटी डेपो करण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीत दिले आणि पहिल्या दीड-दोन वर्षांतच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात या डेपोला मंजुरी आणून ते पूर्णत्त्वासही नेऊन दाखवले. तसेच तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते या डेपोचे उद्घाटनही झाले. या उद्घाटनाला दोन वर्षे लोटली तरी अद्याप कर्जतचा एसटी डेपो सुरु झालेला नाही. त्यामुळे आधी डेपो करण्यासाठी आंदोलन आणि आता उद्घाटन झालेला एसटी डेपो सुरु करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.

हा डेपो सुरु होत नसल्याने स्थानिक नागरीक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, वृद्ध या सर्वच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजात येण्यासाठी वेळेत एसटी बस मिळत नाही, तालुक्यातील शेतकरी, व्यापारी यांनाही प्रवासासाठी तासनतास बसची वाट बघण्याची वेळ येते. या भागात सद्गुरु संतश्री गोदड महाराज, सिद्धटेकचा गणपती, राशीनची जगदंबा माता अशी अनेक अध्यात्मिक स्थळे आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून भाविक कर्जतला दर्शनासाठी किंवा वेगवेगळ्या उत्सवाच्या निमित्ताने येत असतात. त्यांचीही प्रवासाची मोठी गैरसोय होते.

त्यामुळे हा डेपो सुरु करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदंचद्र पवार पक्षाच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तरीही डेपो सुरु झाला नाही. त्यामुळे अखेर स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांच्यावतीने कर्जतमध्ये लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे.

या उपोषणाची तातडीने दखल घेत एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि हा डेपो सुरु करण्यासाठी लागणारी संपूर्ण कार्यवाही २० सप्टेंबरपर्यंत करण्याचे तसेच १० सप्टेंबरपर्यंत १० बस एसटी बस सुरु करण्याचेही आश्वासन या या पत्रात देण्यात आले आहे. या आश्वासनानंतर हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रघु (आबा) काळदाते, बळीराम अण्णा यादव, गुलाब काका तनपुरे, किरण पाटील,पोपट आबा खोसे, बाळासाहेब साळुंखे, पूजाताई सूर्यवंशी, प्रीतीताई जेवरे, सचिन सोनमळी, बाळासाहेब सपकाळ, शाहूराजे भोसले, राम कानगुडे, माऊली सायकर, डॉ. चंद्रकांत कोरडे, नितीन धांडे, रामचंद्र आबा भोसले, अनिल पांडुळे, नानासाहेब साबळे, दीपक यादव, ज्ञानदेव लष्कर, भूषण ढेरे, नामदेव थोरात, अंगद रुपनर, अजित बापू भोसले, अमोल पाटील, काका शेळके , दत्तात्रय पोटरे, राहुल नवले, डॉ. राजेंद्र पवार, जयसिंग थेटे, मंगेश शिंदे, वृषाली घोडके, दिलीप जाधव, बाळासाहेब मराळ, रज्जाक भाई झारेकरी, अक्षय भाई तोरडमल, सचिन दरेकर , काकासाहेब ढेरे, मनोज गायकवाड, शरीफ भाई पठाण, काकासाहेब लांगोरे, स्वप्नील तनपुरे, अजय नेवसे, सचिन मांडगे, महेश जगताप, प्रतीक ढेरे यांच्यासह मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या उपोषणात सहभागी झाले होते.

चौकट
‘‘आश्वासनाप्रमाणे कर्जतचा एसटी डेपो मंजूर करुन पूर्ण करुन दाखवला आणि त्याचं उद्घाटनही केलं. परंतु केवळ या कामाचं श्रेय मिळू नये म्हणून राजकीय द्वेषातून हा डेपो सुरु केला जात नाही. याबाबत सरकारला वारंवार विनंती केली, पत्रव्यवहार केला, विधानसभेत आवाज उठवला आणि नवीन एसटी बस व मनुष्यबळाची मागणी केली. तरीही सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. अखेर जनमताच्या रेट्यामुळं २० सप्टेंबरपर्यंत डेपोसाठीची संपूर्ण कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य कर्जतकरांचा विजय आहे. या विजयाबद्दल सर्व आंदोलकांचं मनापासून अभिनंदन!’’

रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा