कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव उपक्रम.

जामखेड प्रतिनिधी
वंजारवाडी (ता. जामखेड) – ग्रामीण शेतीला विज्ञानाची जोड देत, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी ‘कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव उपक्रम २०२५-२६’ अंतर्गत दिनांक ४ जून रोजी वंजारवाडी गावात बळीराजाशी संवाद साधला .

या शैक्षणिक उपक्रमांतर्गत कु. प्रणाली अडसुळ, कु. दिशा अनभुले, कु. पल्लवी बोरकर, कु. क्रांती चटाले, कु. पायल देशमुख व कु. सानिया देशमुख या सहा कृषि कन्या गावात २४ आठवड्यांसाठी वास्तव्यास असणार आहेत. त्यांनी गावातील शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमात १८ प्रकारच्या प्रगत कृषि तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसमोर मांडली जाणार आहेत. यात माती परीक्षण, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, बाजारभाव, जनावरांची काळजी व संगोपन आणि महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.

या कृषिकन्यांचा मुख्य उद्देश गावातील शेती व्यवस्था, शेतकऱ्यांच्या अडचणी, जीवनशैली, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि पीक पद्धतीचा बारकाईने अभ्यास करणे हाच असून त्यातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

गावात आगमनानंतर कृषिकन्यांनी वंजारवाडी ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी सरपंच प्रकाश जायभाय, उपसरपंच हरिदास करांडे, सदस्य रमेश तुपेरे आणि ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

या उपक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्र प्रमुख डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्कर्षा गवारे यांच्यासह इतर विषयतज्ञ करणार आहेत.


