पुरातन बारवांची दुरूस्ती करण्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे आशा पल्लवीत.

- Advertisement -spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जवळा परिसरात बांधलेल्या बारवेचे जतन व्हावे.

जामखेड प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुरातन बारवांची दुरूस्ती करण्याची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने अहिल्यादेवींनी बांधलेला तालुक्यातील जवळा परिसरातील बारवेची दुरूस्ती होण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या राज्यकारभारात संपुर्ण देशभर अनेक ठिकाणी मंदिर, घाट आणि बारव बांधल्या. त्यांचे जन्मगाव चौंडी येथे अहिल्यादेवींनी बांधलेली मंदिरे आणि सीना नदीवर घाट आहे.मात्र बारव नाही. त्यामुळे चौंडीत येणा-या पर्यटकांना जवळा परिसरात अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर अहिल्यादेंवीनी बांधलेली बारव पाहता येईल. ऐतिहासिक वारसा असलेल्या या पुरातण बारवेचे बांधकाम जवळा येथे शके १७०८ मध्ये करण्यात आले. या बारवेमध्ये असलेल्या शिलालेखात ” श्रीमंत मातोश्री अहिल्याबाई होळकर यांनी उत्तरायणे वैशाख शुध्द शके १७०८ या विहीरीचे काम रयतेसाठी केले ” असा स्पष्ट उल्लेख आहे. बारवाचे बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. मात्र बारवाच्या आतील बाजुस पायथ्याशी खालील बांधकामाचे दगड निसटलेले आहेत.त्यामुळे भविष्यात बारवाच्या भींती कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. बारवेचा आकार वरील बाजुने ५० फुट बाय ५० फुट लांबी रूंदीची चौकोनी असून, खाली आतील बाजुने अष्टकोनी आकार आहे. बारवेला मोटेने पाणी उपसा करण्यासाठी मोठी धाव आहे.त्याचबरोबर खाली उतरण्यासाठी शेवटपर्यंत पाय-या आहेत. याच बारवेमध्ये नंदकेश्वर हे शिवलिंग आहे.

या बारवेच्या पश्चिमेला पुरातण हेमांडपंथी भैरवनाथ मंदिर आहे.या मदिराच्या बाहेरच्या भिंतीची पडझड झाल्यानंतर लोकसहभागातून या भिंती पुन्हा दगडातच बांधण्यात आल्या आहेत. एकुण आठ दगडी खांबावर उभे असलेल्या भैरवनाथ मंदिराची बांधणी अतिशय आखीव रेखीव आहे.

चौकट – १

बारव आणि भैरवनाथ मंदिरालगत अनेक पुरातण मुर्ती पाहायला मिळतात.त्यामध्ये श्री विष्णु, गणपती, हनुमान , सतीशिला यांच्यासह अनेक पुरातण मुर्ती जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

चौकट – २

जवळा परिसरात पावसाने ओढ दिल्यास, याच बारवेत फुले सोडत, नंदकेश्वराची मनोभावे आराधना करण्याची गावक-यांची रूढ परंपरा आहे. ती आजही जपली जाते.

चौकट – ३

चैत्र अष्टमीला उत्सव..
——————————
भैरवनाथ मंदिरात दरवर्षी चैत्र महिण्यात अष्टमी दिवशी जवळा ,मतेवाडी व गोयकरवाडी ,बावी, हाळगाव,खरातवाडी येथील भाविक एकत्र येवुन उत्सव साजरा करतात.यानिमित्त नामजागर करण्याबरोबरच भंडारा महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

प्रतिक्रिया –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली जवळा परिसरातील बारव ही या परिसरातील ऐतिहासिक वारसा आहे. तो जतन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.

— सुशील आव्हाड
लोकनियुक्त सरपंच,जवळा

प्रतिक्रिया –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जवळा येथे शके १७०८ मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक बारवेची दुरावस्था झाली असून, ती दुरूस्ती होणे काळाची गरज असून, शासनाने हे काम हाती घेवुन बारव दुरूस्तीबरोबरच परिसराचे सुशोभीकरणाचे काम करावे.
— प्रशांत शिंदे
उपसरपंच,जवळा

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा