विद्यालयासाठी एक लाख खर्चाचे व्यासपीठ बांधण्यासाठी माजी विद्यार्थ्याचा पुढाकार.

- Advertisement -spot_img

माजी विद्यार्थी दादा नामदेव लोंढे यांनी उचलला खर्च

जामखेड प्रतिनिधी

माध्यमिक विद्यालयात व्यासपीठ नसल्याने मुलांच्या परिपाठाच्या वेळी येणारी अडचण माजी विद्यार्थ्यांनी सोडवण्यासाठी पुढाकार घेत,या कामाचा पाया रचला आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर व्यासपीठ नसल्याने प्रत्यक्ष परिपाठाच्या वेळी  मोठी गैरसोय होत होती. सांस्कृतिक कार्यक्रम किंवा आनंददायी शनिवार साजरा करण्यासाठी व्यासपीठ नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी एखादे उंच व्यासपीठ असावे अशी इच्छा दररोज शाळकरी मुले व्यक्त करीत होते. मात्र निधीअभावी याकामाकडे दुर्लक्ष होत होते.

दरम्यान सन २००५ च्या दहावी  बॅचच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात  परिपाठाच्यावेळी व्यासपीठाची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणून देण्यात आले. त्यावर  माजी विद्यार्थी दादा नामदेव लोंढे यांनी या मदतीला अपेक्षित प्रतिसाद देऊन एक सुंदर असे व्यासपीठ देण्याचे कबूल केले आणि लगोलग अभियंत्यांकडून बजेट काढून घेतले. सुमारे एक लाख रुपये अंदाजे किमतीचे हे व्यासपीठ मुलांच्या परिपाठासाठी उपयोगाला येणार आहे.

या व्यासपीठाची संकल्पना शिक्षक संतोष सरसमकर यांनी मांडली.त्याला  माजी विद्यार्थी  दादा नामदेव लोंढे यांनी हे काम मूर्त स्वरूपात येण्यासाठी संपुर्ण आर्थिक स्वरूपाची मदत करण्याचे ठरविले.

बुधवारी (ता.१६) या व्यासपीठ बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जोरे, पर्यवेक्षक कैलास बिरंगळ, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शहाजी पाटील, गौतम मते,दत्तात्रय हजारे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतराम सूळ, सदस्य डाॅ. दीपक वाळुंजकर , डाॅ.ईश्वर हजारे, अशोक पठाडे, अनिल हजारे, महावीर पोफळे  गुरूकुल प्रमुख अशोक रणखांब व  बाबासाहेब आंधळे, अमोल भोंडवे पप्पू गाडे ,महादेव साळुंखे  यांच्यासह शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट – १

व्यासपीठाची मुळ संकल्पना मांडणारे कलाशिक्षक संतोष सरसमकर  यांनी २० वर्षापुर्वी छत्रपती शिवाजी विद्यालयात देणगीच्या माध्यमातून व्यासपीठ बांधले होते. दरम्यानच्या काळात नव्याने इमारत झाल्याने या इमारतीसमोर व्यासपीठाची गरज भासु लागली होती. मात्र नूकतेच जवळा येथे  बदली होवून आलेले शिक्षक संतोष सरसमकर यांनी याकामी पुन्हा पुढाकार घेतल्याने, वीस वर्षानंतरही त्याच्याच माध्यमातून व्यासपीठ बनत आहे.

चौकट – २

प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतलेले दानशूर दादा नामदेव  लोंढे.
——————————————
प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतलेले मातंग समाजातील दादा नामदेव  लोंढे यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच.माध्यमिक शिक्षण जवळा येथे पुर्ण केल्यानंतर जामखेडला उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. यानंतर पुढील  शिक्षणासाठी पुण्याला गेले.मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही आणि पुढे रोजगाराचा शोध घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात ट्रान्सपोर्ट व्यवसायात त्यांनी चांगला जम बसवला. आपल्या गावच्या शाळेविषयी असलेल्या आस्थेतून त्यांनी आज शाळेसाठी व्यासपीठ बांधकामासाठी तब्बल एक लाखाचा खर्च उचलला आहे.

प्रतिक्रिया –

‘ जेवणाचे ताट विका आणि पुस्तक घ्या ‘ हा विचार देणा-या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करत असून, ज्या मातीत शिकलो,वाढलो त्या मातीशी इमान राखण्याचा  प्रयत्न करत आहे.

दादा नामदेव लोंढे
    माजी विद्यार्थी

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा