महिला प्रवाशांना दिलासा; आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याने उशिराची एसटी पुन्हा वेळेत.

- Advertisement -spot_img

महिला प्रवाशांना दिलासा; आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याने उशिराची एसटी पुन्हा वेळेत.

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी आकाश बाफना सरसावले; प्रशासनाने तातडीने घेतली दखल.

जामखेड प्रतिनिधी
रत्नापूर, पाटोदा, अरणगाव, माहिजळगाव ते कर्जत दरम्यान धावणारी सायंकाळची एसटी बस गेल्या काही दिवसांपासून तब्बल दोन तास उशिराने येत असल्याने महिला प्रवासी, विद्यार्थिनी तसेच नोकरदार महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या पाठपुराव्यानंतर ही बससेवा पुन्हा वेळेत सुरू झाल्याने महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण भागातील रत्नापूर, पाटोदा, अरणगाव आदी परिसरातील अनेक महिला जामखेड शहरात शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करतात. मात्र सायंकाळची एसटी बस उशिराने येत असल्याने महिलांना रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर थांबावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. अनेक दिवस तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने महिला प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

अखेर महिला प्रवाशांनी आपली व्यथा शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेत जामखेड आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे यांना निवेदन दिले. तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जामखेड बसस्थानकावर विशेष सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणीही केली.

याचबरोबर अहिल्यानगर येथील वाहतूक नियंत्रक रविंद्र जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बससेवा पूर्ववत वेळेत सुरू करण्याची मागणी केली. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित बससेवा वेळेत सुरू केली.
त्यानंतर आकाश बाफना यांनी जामखेड बसस्थानकावर प्रत्यक्ष भेट देऊन बस वेळेत येत असल्याची पाहणी केली. तसेच महिला प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या इतर अडचणी व समस्यांची माहितीही जाणून घेतली.
महिला प्रवाशांचा प्रवासाचा प्रश्न मार्गी लागल्याने आकाश बाफना यांनी जामखेड आगार प्रशासनाचे आभार मानले. यावेळी उपस्थित महिलांनीही समाधान व्यक्त करत बाफना यांच्या तत्पर पाठपुराव्याचे कौतुक केले.

यावेळी शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, जामखेड एसटी आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे, वाहतूक नियंत्रक शिवदास उगले, चालक अनिल चौगुले, वाहक वैभव भांगे, विठ्ठल जायभाय, अशोक कुमटकर, दत्तात्रय जगताप, अनिकेत देशमुख तसेच महिला प्रवासी मोनिका सरकाळे, सारिका वारे, दिपाली शेख, अनिता जाधव आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा