२५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करणार ; युवराज गायकवाड यांचा इशारा.

- Advertisement -spot_img

लेखी आश्वासनानंतर नायगाव अतिक्रमण हटाव उपोषण स्थगित.

२५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करणार ; युवराज गायकवाड यांचा इशारा

जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे नायगाव येथील श्रीनाथ मंदिर परिसर व ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत टपऱ्या, दुकाने आणि इतर अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले.

उपोषणकर्ते युवराज अर्जुन गायकवाड यांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत उपोषण स्थगित केले असले, तरी ठरलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
नायगाव येथील रहिवासी युवराज गायकवाड यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदन देऊन श्रीनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केली होती.

ग्रामपंचायत हद्दीत काही अतिक्रमण धारकांनी अनधिकृत टपऱ्या, दुकाने व इतर बांधकामे उभारून सार्वजनिक जागा अडवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असून संबंधितांना अप्रत्यक्ष मदत केली जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला होता.

मात्र वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने युवराज गायकवाड यांनी बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी पंचायत समिती, जामखेड कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, नायगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी के. आर. टकले यांनीही लेखी आश्वासन देत गावाची हद्द निश्चित करून अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील पंचवीस दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर युवराज गायकवाड यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले. मात्र दिलेल्या मुदतीत अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा