सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याने जामखेडच्या शेतकऱ्यांना दिलासा; ७८ लाखांचे अनुदान मंजूर..
अतिवृष्टीग्रस्त ५२७ शेतकऱ्यांना आर्थिक मदत; विहीर दुरुस्तीसाठी शासनाचा हातभार
जामखेड प्रतिनिधी
२०२५-२६ च्या खरिप हंगामात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे नुकसान झालेल्या जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या माध्यमातून तब्बल ७८ लाख ४२ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मदत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
प्राप्त आदेशानुसार हा निधी दोन टप्प्यांत वितरित करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात १२८ शेतकऱ्यांसाठी सुमारे १८ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ३९८ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सुमारे ५९ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही टप्प्यांतून जामखेड तालुक्यातील एकूण ५२७ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतीपयोगी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळालेल्या या मदतीमुळे विहिरींची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पुन्हा शेती उभी करण्यास हातभार लागणार आहे.

प्रा. राम शिंदे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या मदतीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी व्यक्त केले.



