रिमझिम सरींनी दिला दिलासा; जामखेडकरांना उकाड्यातून काहीसा गारवा.
ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट; बळीराजाची आता मान्सूनपूर्व पावसाकडे नजर
जामखेड प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या जामखेडकरांना अखेर रिमझिम पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कालपासून तालुक्यात वातावरणात अचानक बदल होत आकाशात ढग दाटून आले असून अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत.

आज सकाळीही हलक्या पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा आराम मिळाला आहे.

मागील आठवडाभर जामखेड तालुक्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. पारा तब्बल ४२ अंशांच्या जवळ पोहोचल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच शेतकरी वर्गाला या उष्णतेचा मोठा फटका बसत होता.

मात्र कालपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील चौक, बाजारपेठ तसेच ग्रामीण भागातही वातावरण प्रसन्न झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान, आता शेतकऱ्यांच्या नजरा मान्सूनपूर्व पावसाकडे लागल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी नांगरणीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या अंतिम टप्प्यात आहेत. सात जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करण्यासाठी शेतकरी तयारी करत आहेत. त्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

मान्सूनपूर्व पाऊस वेळेत आणि समाधानकारक झाल्यास खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असून शेतकऱ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


