जामखेडमध्ये अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई. पाच हॉटेलांवर छापे; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाच गुन्हे दाखल

- Advertisement -spot_img

जामखेडमध्ये अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई.
पाच हॉटेलांवर छापे; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाच गुन्हे दाखल
जामखेड प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जामखेड शहरात खर्डा पोलीस पथकाने मोठी कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या पाच ठिकाणी धडक छापेमारी केली. या कारवाईत ४१ हजार ४७० रुपयांचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांना गुप्त बातमीदारामार्फत जामखेड शहरातील काही हॉटेलांमध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार खर्डा पोलीस ठाण्याचे सपोनि उज्वलसिंह राजपूत यांना विशेष कारवाईचे आदेश देण्यात आले.

या आदेशानुसार सपोनि राजपूत यांनी पोलिस पथकासह जामखेड शहरात धडक मोहीम राबवत खर्डा रोड व नगर रोड परिसरातील विविध हॉटेलांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत हॉटेल सागर, हॉटेल तांबे, हॉटेल साई, हॉटेल साहेबा तसेच नगर रोडवरील हॉटेल पाटीलवाडा येथे अवैधरित्या साठवून ठेवलेला देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सागर पांडुरंग नेटके, ज्ञानेश्वर रंजित तांबे, राजेंद्र रामभाऊ देवकाते, सचिन विक्रम तनपुरे आणि उमेश विनोद मुळे या हॉटेल चालक-मालकांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये जामखेड पोलीस ठाण्यात पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि उज्वलसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शशी म्हस्के, पंडित हंबर्डे, धनराज बिराजदार, अशोक बडे आणि गणेश बडे यांनी मोहिमेत सहभाग घेतला. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा ‘कडक इशारा’
मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर विशेष मोहीम
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून जामखेड शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व्यवसायांवर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने धडक कारवाई केली.

या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनाकडून अशा धंद्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा