बंधुभावाचा संदेश देत जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात गुरुवारी बकरी ईद (ईद-उल-अजहा) मोठ्या उत्साहात,धार्मिक वातावरणात आणि सामाजिक सलोख्याच्या भावनेत साजरी करण्यात आली.

सकाळपासूनच शहरातील मशिदी व ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नमाज पठणानंतर एकमेकांच्या भेटीगाठी घेत ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली.

शहरातील ईदगाह मैदानावर मौलाना मुफ्ती अब्दुल आलीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी देशात शांतता, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य कायम राहावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
नमाजपूर्वी धार्मिक व्याख्यान झाले, तर नमाजनंतर खुदबा सादर करण्यात आला.

तालुक्यातील विविध भागांतून हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर दाखल झाले होते. सकाळी साडेआठ वाजल्यापासून शहरातील विविध मशिदींमध्येही ईदची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सर्व धर्मीय नागरिकांनीही मुस्लिम समाजबांधवांना भेटून शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदान, जयहिंद चौक, खर्डा चौक तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि प्रशासकीय यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नमाजनंतर शहरातील विविध दर्गे आणि कब्रस्तान परिसरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

दरम्यान, बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांच्या खरेदी-विक्रीला तालुक्यात मोठी मागणी होती. विविध आठवडे बाजारांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. यावर्षी बोकडांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाल्यानेही बाजारपेठेत उत्साह कायम होता. गुरुवारपासून शनिवारपर्यंत तालुक्यात अनेक ठिकाणी कुर्बानीचा धार्मिक विधी पार पडणार आहे.
सोशल मीडियावरही सर्व धर्मीय नागरिकांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.


