आमदार कर्डीले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश ! पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील.

- Advertisement -spot_img

आमदार कर्डीले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश ! पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील

एकीकडे कर्डीले विजयी, दुसरीकडे तनपुरे भाजपमध्ये; विखेंचा डबल स्ट्राइक

जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते, माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथील पक्षकार्यालयात पार पडला.

भाजपमध्ये प्रवेशासोबतच प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषद उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेले तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

पक्षांतर्गत समन्वय साधत त्यांनी भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यानंतर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल ११ पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. त्यामुळे कर्डीले यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतिकार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहिले गेले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधी तब्बल सहामहिन्यांपासून डॉ सुजय विखे पाटील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्कात होते

याच राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला असून जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली आणि त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली.

एकीकडे अक्षय कर्डीले यांना आमदार करण्यात यश मिळवताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती त्यांनी यशस्वीपणे राबवली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यामागे आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यामागे डॉ. सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आज रंगली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा