पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जामखेडच्या भूमीला लाभला आहे : नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी.
नगर परिषदेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन.
जामखेड प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त जामखेड नगर परिषदेच्या वतीने खर्डा चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात तसेच मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जामखेड तालुक्याच्या पुण्यभूमीला लाभला आहे. अशा महान परंपरेच्या भूमीत सामाजिक व राजकीय कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते, हे आपले भाग्य आहे. अहिल्यादेवींचे कार्य केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून ते देशासह जगभरात गौरवाने ओळखले जाते. त्यांनी पाणवठे, पाणीसाठे, धर्मशाळा, उद्योग-व्यापार तसेच अन्नछत्रांच्या माध्यमातून समाजकल्याणाची अनेक कार्ये उभी केली.

संकटकाळात धैर्याने सामना करत जनहित कसे साधायचे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन जामखेड नगर परिषद विकासाभिमुख कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राज्य शासनाच्या वतीने चौंडी येथे भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, गेल्या वर्षी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही चौंडी येथे पार पडली होती. यावर्षीदेखील राज्यातील प्रमुख मान्यवर अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. शासन त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी नगरसेवक तथा भाजपाचे युवा नेते अमित चिंतामणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रशासन, न्यायव्यवस्था, धर्मकार्यातील योगदान तसेच लोककल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. मंदिरांच्या जीर्णोद्धाराबरोबरच त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली. त्यांनी निर्माण केलेले अनेक पाणीसाठे आजही उपयोगात आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जामखेड शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी बोलताना “महापुरुषांच्या जयंती हेच आमचे सण-उत्सव” या संकल्पनेचा उल्लेख केला. नगर परिषदेने सुरू केलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत विविध महापुरुषांच्या जयंती उत्सवांचे आयोजन करण्यात येत असून, हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार नगर परिषदेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेविका वैशाली म्हेत्रे, सीमा कुलकर्णी, नगरसेवक तात्याराम पोकळे, प्रविण चोरडिया, श्रीराम डोके, विकी घायतडक तसेच अमित चिंतामणी, अशोक शेळके, प्रविण होळकर, अमित जाधव, अनिल बाबर, मोहन गडदे, कैलास हजारे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



