कर्जत-जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

- Advertisement -spot_img

कर्जत-जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

जामखेड प्रतिनिधी

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत – जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सभापती प्रा.शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड परिसरात वारंवार वीज खंडित होणे, अनियमित लोडशेडिंग तसेच तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, वीज पुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे.

विशेषतः सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करणे तसेच तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे.
तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सेवा अधिक पारदर्शक व परिणामकारक करावी, असेही त्यांनी नमूद केले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असल्याने संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा