बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक सुधीर राळेभात यांनी दिला इशारा..

जामखेड प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीला उडीद,सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्याची परवानगी मिळून १५ दिवस उलटून गेले तरी अद्यापपर्यंत उडीद सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केलेले नाहीत. बाजार समिती हि शेतकऱ्यांची संस्था असूनदेखील शेतकऱ्याला आपला माल घालण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे.

हमी भाव केंद्र लवकर चालू झाले नाही तर शेतकऱ्याला आपले सोयाबीन १०००/१२०० रु.च्या तोट्यावर व्यापाऱ्यांना माल द्यावा लागत आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.त्यामुळे बाजार समितीने हमीभाव केंद्र लवकरात लवकर चालू करावेत तसेच उडीद, सोयाबीनची नोंदणी देखील अत्यंत हळुवार पद्धतीने चालू आहे.जवळ-जवळ १००० ते १२०० शेतकऱ्यांची नोंदणीचे कागदपत्रे बाजार समितीने आपल्याकडे घेतली असून त्यातील फक्त ४०० ते ४५० शेतकऱ्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे.

त्यामुळे येत्या ४ दिवसात खरेदी केंद्र चालू केले नाही तर दिनांक १५/१२/२०२५ रोजी सभापती, सचिव यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल,असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री.सुधीर जगन्नाथ राळेभात यांनी दिला आहे.



