जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रा उत्सव

जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘शिवलीलामृत’ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पारायणाची सुरुवात झाली. यामध्ये वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा मंगळवारी सकाळी होणार आहे.

शिवलीलामृत पारायण मध्ये
१५१ वाचकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. दररोज भल्या पहाटे काकडा आरती होते सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले जाते. दररोज सकाळी ग्रंथ पूजन, १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्र जप, अभंग गायला जातो, नंतर अध्यायातील ओव्या वाचन व शेवटी महादेवाच्या आरतीने रोजच्या पारायणाची सांगता होते. त्यानंतर लगेच गाथा भजन होते.यामुळे मंदिर परिसरातील वातावरण सकाळी अतिशय प्रसन्न वाटते.

श्रावण शुद्ध पंचमीला (नागपंचमी) श्रीनागेश्वराची यात्रा असते. या उत्सवाच्या निमित्ताने येथे सद्गुरु संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने २४ जुलै पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा, सकाळी शिवलीलामृत पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त मंगळवारी प्रातःकाळी महापूजा होईल नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. परीसरातील सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.

गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत चेतन महाराज बोरसे मालेगाव यांचे कारल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.


