रक्तदात्यांना भेट म्हणून २० लिटर पाण्याचा जार दिला जाणार मोफत.

जामखेड प्रतिनिधी
दांडेगाव (ता. भूम) – संत एकनाथ महाराज पालखी महोत्सवानिमित्त भगवंत रक्तपेढी, बार्शी आणि दांडेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जून 2025 रोजी शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत गणपती मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तरुण उद्योजक, शिक्षक व सुशिक्षित युवक-युवती यांच्या पुढाकाराने या सामाजिक उपक्रमाला मूर्त स्वरूप आले आहे. संत एकनाथ महाराज पालखी सोहळा हा गावासाठी एक आनंदाचा व उत्साहाचा पर्वणीचा क्षण असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने गावातील तसेच गावाबाहेरील भाविक मोठ्या संख्येने येतात, त्यातच पालखीतील वारकरी बंधूंचेही आगमन होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडेगाव गावकऱ्यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती हा आपला घरचा कार्यक्रम आहे अशा भावनेने या सेवेत सहभागी होत असतो. गावकरी आपल्या वैयक्तिक मतभेदांना बाजूला ठेवून, एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे या सोहळ्याचे आयोजन करतात, हे विशेष उल्लेखनीय आहे.

25 जून रोजी भूम तालुक्याचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी गावात भेट देऊन पालखी विसाव्याच्या ठिकाणाची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची, निवासाची, स्वच्छतेची व वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची व्यवस्था व्यवस्थित आहे का, याची त्यांनी प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली. प्रशासन व ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहकार्याने सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रक्तदात्याला भगवंत रक्तपेढी, बार्शी यांच्या वतीने २० लिटर पाण्याचा जार भेट दिला जाणार आहे. रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होतात, हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि एक वेळच्या रक्तदानातून तीन लोकांचे प्राण वाचू शकतात, हे लक्षात घेता नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.


