जामखेड प्रतिनिधी
इरकलचं नऊवारी लुगडं, ठिपक्यांची चोळी, नाकावर नथ अन् डोक्यावर पदर… आज सकाळी-सकाळीच एक आजीबाई थेट विधान परिषदेत दाखल झाल्या. डोळ्यात तेज होतं, चेहऱ्यावर हास्याचे भाव होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात एक तृ्प्त समाधान घेऊन ही आजीबाई थेट आमदारांचं कामकाज पहायला दाखल झाल्या. या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून, सभापती राम शिंदे यांच्या मातोश्री होत्या. भामाबाई शिंदे होत्या.

कर्जत-जामखेडचे रहिवाशी प्रा. राम शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतीपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळीही त्याच्या मातोश्री भामाबाई त्यांच्यासोबत होत्या.

पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्यासोबतही त्यावेळी दिलखुलास गप्पा मारल्या. आपल्या लेकाचं कर्तुत्व पहायला, या मातेचे डोळेही त्यावेळी सुपाएवढे झाले होते. आज हीच मायमाऊली थेट विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचली.

सभागृहात आपल्या लेकाचं कौतूक या मातेनं पुन्हा एकदा डोळे भरुन पाहिलं. विधीमंडळात नाकात नथणी, अंगावर नऊवारी लुगडं, अंगात चौकटीची चोळी, डोक्यावर पदर घेत भामाबाई विधीमंडळात पोहोचल्या. तेव्हा विधीमंडळ परिसरातील सगळेच कॅमेरे आपसूक त्यांच्याकडे वळले. या आजीबाई सभापती राम शिंदे यांच्या मातोश्री असल्याचं समजलं, तेव्हा या पत्रकारांनी त्यांना बोलतं केलं. आपल्या लेकाप्रमाणेच त्यांनीही पत्रकारांना फर्राटेदार उत्तरं दिली. दहा-पंधरा कॅमेरे त्यांच्यावर खिळले होते. त्यांनी पत्रकारांना हवी तशी पोजही दिली.

या मातोश्रींचं राम शिंदे यांचे राजकीय विरोधक आ. रोहित पवारांनीही कौतूक केलं. याबाबत त्यांनी खास फेसबुक पोस्टही केली. राम शिंदे हे माझे राजकीय विरोधक आहेत. पण उच्च पदावर बसलेल्या आपल्या मुलाला भेटायला त्यांच्या मातोश्री विधीमंडळात आल्या. तेव्हा त्यांचा ऊर नक्कीच अभिमानाने भरुन आला असेल. आपली संस्कृती परंपरा जपणारी ही जुनी पिढी आजच्या नवीन पिढीसाठी नक्कीच आदर्शवत आहे. या मातेला माझाही दंडवत… असं म्हणत रोहित पवारांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.



