जवळा येथील विठ्ठल रूक्मिणी मुर्ती पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीचे प्रतिरूप.

- Advertisement -spot_img

आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

जामखेड प्रतिनिधी

जवळा येथील विठ्ठल रूक्मिणी मुर्ती ही  पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीचे प्रतिरूप मानले जाते.  भाविकांमध्ये तशी श्रध्दा असून, आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

जवळा येथील विठ्ठल मंदिरात मुख्य उत्सव आषाढी एकादशीनिमित्त पहाटे पासूनच  अभिषेकाने सुरुवात झाली . पुष्प सजावट , रांगोळ्यांनी मंदिर परिसर शोभायमान करण्यात आला होता. सकाळी वारकऱ्यांनी हरिनामाचा जागर करत नगर प्रदक्षिणा करून, आरती करण्यात आली. नंतर उपवासाचे फराळ प्रसादचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भजन , किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जवळा येथील विठ्ठल रूक्मिणी मुर्ती वैशिष्ट्यपुर्ण आहे. पंढरपूरच्या   विठ्ठल मुर्तीवर अंगावर जसे चिन्ह आहेत तशाच प्रकारचे चिन्ह नैसर्गिक रित्या इथेही पहावयास मिळतात.मुर्तीच्या मस्तकी शिवलिंग आहे , तिथे शुभ्र रंगाचा ठिपका आहे  गळ्यात कौस्तुभ मणी विराजमान आहे . अर्धांगी रूक्मिणी मातेचे चिन्ह आहे . मुर्तींचे  देखणे रूप आणि प्रमाणबध्दता, पंढरपुरच्या विठ्ठल रूक्मिणी मुर्तींना ज्या पध्दतीने पोषाख चढवला जातो , तसाच हुबेहुब  पोषाख जवळा येथील मुर्तींना  चढवला जातो. मुर्तीवर चढवलेले  अलंकार सौदर्यात आणखी भर घालत असल्याने मुर्तीचे रूप आणखी खूलून दिसत असल्यामुळे,  पंढरपुरच्या विठ्ठल रूक्मिणी मुर्तीचे प्रतिरूप रूप मानले जाते. दर्शन केल्यानंतर  प्रत्यक्ष पंढरी मध्ये दर्शन केल्याचे समाधान मिळते , असा भाविकांचा अनुभव आहे.

  पंढरपुरच्या मंदिरात ज्या नित्यसेवा त्याच जवळयाच्या विठ्ठल मंदिरात होतात. हेही या मंदिराचे वैशिष्टय आहे.  विठ्ठल   मंदिरात नित्य पूजेची सुरुवात श्रींच्या काकड आरतीने होते . पहाटे ५ वाजता सेवेला प्रारंभ होतो. श्रींना जागवल्या नंतर शेज आरतीचा पोशाख उतरवला जातो . तत्पश्र्चात , मुर्तींना स्नान आदी उपचार होतात . नित्य नूतन पोशाख झाल्यानंतर गंध ,पुष्प , धूप, दीप, नैवेद्य होतो .  श्रींच्या नित्य उपचारांचा शेवट आरतीने होवून उपस्थित भविकांना प्रसाद वाटला जातो .

जवळा येथील विठ्ठल  मंदिरात नित्य उत्सव तसेच वार्षिक उत्सव भक्तीभावाने साजरे होतात . गुढीपाडव्याने उत्सवांची  सुरुवात होते . नूतन ध्वज शिखरावर लावला जातो . मुर्तींना नवीन पोशाख , अलंकार परिधान केले जातात . 

जवळा येथील विठ्ठल मंदिरात शाही विवाह सोहळा प्रतिवर्षी माघ शु. पंचमी ( वसंत पंचमी ) ला पंढरपुर येथे श्री विठ्ठल रखुमाई यांचा भव्य विवाह सोहळा आयोजित होतो. त्याच पार्श्वूमीवर येथे ही हा सोहळा आयोजित केला जातो.  प्रतिवर्षी  वयस्कर वारकऱ्यांना या सोहळ्याच्या पूजेस बसण्याचा मान मिळतो . ब्रम्ह वृंदांच्या , ग्रामस्थांच्या साक्षीने हा भव्य सोहळा साजरा होतो . त्या दिवशी मुर्तीना वधू – वरा प्रमाणे नवीन वस्त्र परिधान , अलंकार परिधान केले जातात . उत्सव मूर्तींना अभिषेक होऊन पोशाख  होतो . मंगल अष्टका , सनई चौघड्यांचा स्वरात मुर्तींचा शाही विवाह सोहळा संपन्न होतो . याव्यतिरिक्त , प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीस कीर्तन सेवा , अन्नदान, वैष्णव भोजन  कार्यक्रम होतात .

मंदिरातील उत्सवा मध्ये नवरात्र उत्सव ही विशेष आहे . या उत्सवात  विठ्ठल – रुक्मिणी मातेला नित्य अलंकार  परिधान केले जातात. देवींच्या विविध रुपात रूक्मिणीमातेची पूजा बांधली जाते .

मंदिर पूर्वाभिमुख असून , प्रथम मोठा सभामंडप , नंतर   छोटा सभामंडपामध्ये गाभारा अशी रचना आहे .  विशेष म्हणजे फक्त कार्तिक महिन्यातच मूर्तीवर थेट सूर्याची प्रातः काळाची सोनेरी किरणं पडतात.  हा किरणोत्सव प्रतिवर्षी पहावयास मिळतो .

चौकट – १

जवळा येथील विठ्ठलमंदिर पुरातन समजले जाते.मात्र कालांतराने त्यामध्ये परिस्थितीनूसार बदल होत गेले. सध्याच्या विठ्ठल – रूक्मिणी मुर्ती सन १९५८ मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आल्या आहेत.  त्यापुर्वी याठिकाणी विठ्ठल रूक्मिणी मुर्ती या खूपच लहान असल्याने ग्रामस्थांनी  लहान मूर्ती काढून नव्याने मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती . या मूर्ती त्याकाळी वाहनांची सोय नसल्याने बैलगाडीमधून पंढरपुरहून आणण्यात आल्या होत्या असे जुने जाणकार लोक सांगतात.

चौकट – २

लक्ष्मीकांत वाघमारे यांची निस्वार्थ सेवा.
———————————————

सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मीकांत वाघमारे यांची विठ्ठल मंदिराप्रती निस्वार्थ सेवा वाखण्याजोगी आहे. मंदिरात स्वच्छता ठेवण्यापासून , विठ्ठल रूक्मिणीची दैनंदिन नित्यसेवेबरोबरच आकर्षक पोशाख परिधान करणे,अलंकार चढवणे अशी कामे ते विनामोबादला मोठ्या भक्तीभावाने करतात.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा