भटक्या-विमुक्त महिलांसाठी तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी जेंडर व प्रजनन आरोग्य हक्कांवर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

- Advertisement -spot_img

भटक्या-विमुक्त स्त्रियांच्या लैंगिक व प्रजनन आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे:आनंद पवार..

जामखेड प्रतिनिधी
पंचायत समिती,जामखेड व ग्रामीण विकास केंद्र,जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील भटक्या-विमुक्त समुदायातील महिला सामाजिक कार्यकर्त्या, एकल महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एकल महिला व आरोग्य कार्यकर्त्यांसाठी “जेंडर (लिंगभाव समानता) व महिलांचे प्रजनन आरोग्य हक्क” या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी जामखेड येथील महावीर मंगलकार्यालयात यशस्वीरीत्या पार पडली या कार्यशाळेत तालुक्यातील ३०० हून अधिक महिला सहभागी होत्या.


कार्यशाळेचे उद्घाटन सहभागी महिला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांचे प्रतीकात्मक फुगे फोडून करण्यात आले. याचसोबत बालविवाह मुक्त समाज घाडवुयात अशी शपथ घेण्यात आली.  यावेळी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या डॉ. शोभाताई आरोळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच रोहिणी येलपणेकर (विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग), हिरा सानप (प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प), उमाताई जाधव (सचिव, ग्रामीण विकास केंद्र), गोविंद बदने ( तालुका संरक्षण अधिकारी) विजय शेवाळे (शिक्षण अधिकारी ) व अ‍ॅड. हर्षल एन. डोके (कायदेशीर सल्लागार, ग्रामीण विकास केंद्र) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सकाळच्या पहिल्या सत्रात “जेंडर (लिंगभाव), पितृसत्ता व महिलांचे आरोग्य” या विषयावर सम्यक संवाद व संसाधन केंद्र, पुणेचे संचालक मा.आनंद पवार यांनी मार्गदर्शन केले. समाजातील लिंगभाव असमानता, पितृसत्ताक रचना आणि त्याचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी त्यांनी सखोल विवेचन केले.

दुसऱ्या सत्रात “महिलांचे प्रजनन आरोग्य आणि हक्क” या विषयावर सम्यक संवाद व संसाधन केंद्र, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक तसेच टाटा इन्स्टिट्यूट, मुंबईचे संशोधक प्रितम पोतदार यांनी मार्गदर्शन केले. महिलांचे कायदेशीर हक्क, आरोग्य सेवांपर्यंत पोहोच तसेच माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे महत्त्व यावर त्यांनी विशेष भर दिला.
समारोप सत्रात सहभागी महिलांनी आपल्या अनुभवांचे व मतांचे सादरीकरण केले. या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये जेंडर संवेदनशीलता, प्रजनन आरोग्याविषयी जागरूकता व हक्कांची जाणीव निर्माण झाल्याचे सहभागींच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले.

“भटक्या-विमुक्त महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न हे मुख्य प्रवाहातील महिलांच्या आरोग्य समस्यांपेक्षा वेगळे आहेत. अज्ञान, अंधश्रद्धा तसेच अनिष्ट रूढी-परंपरांमुळे या महिलांना अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आजही त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांना मुख्य आरोग्य व्यवस्थेत पुरेसे स्थान मिळत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून येत्या काळात भटक्या-विमुक्त महिलांच्या आरोग्यविषयक मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून कार्य केले जाणार आहे.”( उमा जाधव, सचिव, ग्रामीण विकास केंद्र)
तर मा.आनंद पवार यांनी आपल्या मनोगतात,“भटक्या-विमुक्त स्त्रियांच्या आरोग्याचा मुद्दा हा धोरणे,कार्यक्रम आणि चळवळींच्या पातळीवर दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला आहे. भटक्या-विमुक्त स्त्रियांच्या लैंगिक व प्रजनन आरोग्याला प्राधान्य दिल्याशिवाय सार्वत्रिक आरोग्याचे ध्येय (Universal Health) कोणत्याही सरकारला किंवा समाजाला गाठता येणार नाही.”

आयोजकांनी भविष्यातही भटक्या-विमुक्त महिलांच्या आरोग्य व हक्कांवर केंद्रित अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील आशा वर्कर यांच्या गट प्रवर्तक यांनी प्रयत्न केले,तसेच ग्रामीण विकास केंद्राच्या रेश्मा बागवान,ललिता पवार,नेहा भुरे, उर्मिला कवडे, लक्ष्मी दराडे, पूजा जाधव, वैशाली जाधव, मनीषा जाधव,बापू ओव्हाळ,सचिन भिंगारदिवे,ऋषीकेश गायकवाड, वैजुनाथ केसकर संतोष चव्हाण, मच्छिंद्र जाधव, अरुण जाधव, संदीप आखाडे तसेच नगरसेविका संगीता भालेराव व सुरेखा सदाफुले यांनी संयोजन केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा